बाबुराव मोरे नगरातील पालावर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळी शिध्याचे वाटप; गुढीपाडव्यापर्यंत सांगली-मिरजेत शाखाविस्तार करणार – जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे
मिरज-पंढरपूर रोडवरील तासगाव फाटा येथे आज शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याचवेळी बाबुराव मोरे नगर परिसरात माऊली मल्टिपर्पज हॉलच्या मागील बाजूस पालावर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीनिमित्त शिध्याचे वाटप करण्यात आले. शाखा उद्घाटन आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेने परिसरात संघटनात्मक कार्याला सुरुवात केली.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख मोहन व्हनखंडे, सांगली सहसंपर्कप्रमुख रावसाहेब घेवारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रुक्मिणी अंबिगिरे, नगरसेवक सागर व्हनखंडे, कुपवाड शहरप्रमुख सूरज कासलीकर, मनोज जाधव, ओबीसी व्हीजेएनटी सेनेचे अध्यक्ष श्रीकांत यमगर, कार्याध्यक्ष विजय माळी यांच्यासह मिरज तालुक्यातील शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख मोहन व्हनखंडे म्हणाले की, गुढीपाडव्यापर्यंत सांगली आणि मिरज महापालिका क्षेत्रात जास्तीत जास्त शिवसेना शाखांचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. शाखांच्या माध्यमातून पक्षाचे संघटनात्मक काम तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शाखा हे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालावर राहणाऱ्या नागरिकांना शिध्याचे वाटप करून सणाचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाखा उद्घाटनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
शिवसेनेच्या शाखाविस्ताराच्या नियोजनामुळे आगामी काळात सांगली-मिरज परिसरात संघटनात्मक हालचालींना गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

