धारदार शस्त्राने वार; भिंतीवर डोके आपटून केली हत्या

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

पैश्याच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून एका महिलेवर तिच्याच घरात धारदार शस्त्राने वार करून आणि भिंतीवर डोके आपटून हत्या करण्यात आल्याची घटना मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा खुर्द येथे ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. मंदा नारायण पाटील (वय ५०, रा. धानोरा खुर्द) असे मृत महिलेचे नाव असून, महादेव गंगाराम भगत (रा. फाळेगाव व्य.) असे संशयित आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदा पाटील आणि महादेव भगत यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता. पाटील यांनी स्वतःच्या नावावर बचत गटातून पैसे काढून भगत याला दिले होते. त्याने ही रक्कम परत केल्यानंतर आर्थिक व्यवहार पूर्ण झाला होता. मात्र, त्यानंतरही तो वारंवार पैशांची मागणी करून पाटील यांना त्रास देत होता.

३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भगत याने मोबाईलवरून फोन करून पाटील यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या घरासमोर येऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत मंदाबाई पाटील यांनी ३० ऑक्टोबर रोजीच आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भगत याने मंदाबाई पाटील यांच्या घरात त्यांचे डोके भिंतीवर आपटून तसेच धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी आसेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, फरार संशयित आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.