वाशिम जिल्हा प्रशासन आणि ‘डब्ल्यूओटीआर’मध्ये सामंजस्य करार
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जिल्ह्यात जलसुरक्षा निर्माण करणे, शेतीची उत्पादकता वाढविणे आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न शाश्वत करणे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
विदर्भ जलसंवर्धन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि डब्ल्यूओटीआरचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मालेगाव तालुक्यातील २० गावांमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी
या कार्यक्रमांतर्गत एचडीएफसी परिवर्तनच्या सहकार्याने मालेगाव तालुक्यातील २० गावांमध्ये जलसंधारण आणि उपजीविका विकासाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
प्रकल्पाची व्याप्ती :
- २० गावांची निवड
- ६ हजार ८२८ कुटुंबांना लाभ
- ३१ हजार २९१ नागरिकांना अपेक्षित लाभ
जलसंधारणासोबत शेती आणि उपजीविकेलाही चालना
या कार्यक्रमांतर्गत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे, जलसाठ्यांच्या संरचनांचे बळकटीकरण करणे आणि जमिनीची पाणीधारण क्षमता वाढविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यासोबतच शेतकऱ्यांना सुधारित कृषी पद्धतींचे प्रशिक्षण व मार्गदर्शन, पीक पद्धतीत सुधारणा, पशुपालन आणि लघुउद्योगांसारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महिला आणि ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेसाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासन आणि डब्ल्यूओटीआर संस्थेचा समन्वय राहणार आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग, जनजागृती, प्रशिक्षण आणि ग्रामस्तरीय संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराचा कालावधी तीन वर्षांचा आहे.

