पिंपळगाव (ईजारा) येथील टेनिस क्रिकेट स्पर्धेला आमदार श्यामभाऊ खोडे यांची भेट; खेळाडूंशी साधला संवाद
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडागुणांची कमतरता नाही; मात्र या गुणांना योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारे क्रीडा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार श्यामभाऊ खोडे यांनी केले.
‘माझे पंतप्रधान, माझा अभिमान’ या उपक्रमांतर्गत जय भवानी क्रिकेट क्लब, पिंपळगाव (ईजारा), ता. मंगरूळपीर, जि. वाशिम यांच्या वतीने टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आमदार श्यामभाऊ खोडे यांनी सदिच्छा भेट देऊन मैदानावरील खेळाडूंशी संवाद साधला. तसेच खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करून स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना आणि खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातून खिलाडूवृत्ती, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित होते. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळते, तसेच त्यांच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
मातीशी नाते जपत खेळाला प्रोत्साहन देणाऱ्या आयोजकांचा हा पुढाकार युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नवोदित क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळेल आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी स्पर्धेचे आयोजक, पदाधिकारी, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

