LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मानोरा तालुक्यातील रतनवाडी येथे शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मानोरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संबंधित शेतात छापा टाकून तब्बल १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी नारायण किसन व्यवहारे (वय ७०) यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रतनवाडी येथील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती ठाणेदार नैना पोहेकर यांना २ नोव्हेंबर रोजी मिळाली. या माहितीची दखल घेत सायंकाळी सुमारे पाच वाजता कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, ठाणेदार नैना पोहेकर आणि तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी संबंधित शेतात संयुक्तरीत्या धाड टाकली.
यावेळी नारायण किसन व्यवहारे यांच्या शेतात गांजा आढळून आला. पोलिसांनी १५ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची प्रतिकिलो १५ हजार रुपये या दराने एकूण किंमत २ लाख २६ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर व्यवहारे यांना ताब्यात घेऊन मानोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, ठाणेदार नैना पोहेकर, फॉरेन्सिक लॅब पथक, पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगळे, राधेश्याम महल्ले, रोहन तायडे, गोकुळ पांडुळे, सुषमा लोखंडे आणि चालक विजयसिंग राठोड यांनी केली.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू होती. ग्रामीण भागात शेतात गांजाची लागवड झाल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

