जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर AIMIM आक्रमक; तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार तथा माजी आमदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी कारंजा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजाणी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. इम्तियाज जलील यांनी यापूर्वी खासदार आणि आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केले असून, सध्या ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळणे ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धमक्यांची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने तातडीने दखल घ्यावी. संबंधित सुरक्षा यंत्रणेमार्फत त्यांच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन करावे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच राज्याच्या गृह विभागाने आणि संबंधित पोलीस प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते मो. बिलाल पुंजाणी, उपनगराध्यक्ष ॲड. फिरोज शेकुवाले, शिक्षण सभापती जाकिर शेख, बांधकाम सभापती हुसेन बंदूकवाले, आरोग्य सभापती अनीस खान, नियोजन सभापती नदीम अहमद यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि AIMIMचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.