LiVE NEWS UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
नवनाथ बन यांनी शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा भाजपच्या पराभवाची कारणे तपासावीत. राजकारणात विजयाचे श्रेय घेणारे अनेक असतात; मात्र पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्यही नेतृत्वात असले पाहिजे. शिवसेनेला विनाकारण दोष देण्याची भूमिका भाजपने थांबवावी, असे आवाहन प्रा. मोहन वनखंडे यांनी केले. _ प्रा. मोहन वनखंडे
जिल्हाप्रमुख, शिवसेना, सांगली जिल्हा
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला आलेल्या अपयशाची जबाबदारी शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी करू नये. स्वतःच्या पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्याऐवजी मित्रपक्षावर खापर फोडणे ही राजकीय अपरिपक्वता आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांनी व्यक्त केली.
महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष परस्परांचा सन्मान राखून काम करणारे घटक आहेत. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही की मित्रपक्षाला दोष देणे, ही भूमिका महायुतीच्या एकजुटीला बाधा आणणारी आहे. भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी नाकारले असेल, तर त्यामागील कारणांचा शोध भाजपने स्वतःच्या संघटनात्मक कामातून, उमेदवाराची निवड, मतदारांशी असलेला संपर्क आणि प्रचाराच्या नियोजनातून घ्यावा.
शिवसेनेवर आरोप करून भाजपला स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. पदवीधर मतदार हा सुशिक्षित, जागरूक आणि आपल्या प्रश्नांबाबत संवेदनशील असतो. रोजगार, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, बेरोजगारी आणि पदवीधरांचे प्रश्न यांवर मतदारांनी दिलेला कौल समजून घेणे आवश्यक आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीतील निकालाचे सोयीस्कर राजकीय विश्लेषण करून शिवसेनेला लक्ष्य करणे योग्य नाही.
महायुती ही केवळ सत्तेसाठी नसून परस्पर विश्वास, समन्वय आणि जबाबदारीच्या भावनेवर टिकली पाहिजे. मित्रपक्षावर आरोप करण्याऐवजी एकत्र बसून निवडणुकीतील अनुभवांचे विश्लेषण करणे, चुका दुरुस्त करणे आणि पुढील निवडणुकांसाठी समन्वय वाढवणे गरजेचे आहे.

