पूर नियंत्रण, पाणीटंचाई, स्वच्छता आणि बंद पथदिव्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे यांची मागणी
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांच्या निराकरणासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त संजीता मोहपात्रा यांची भेट घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहरातील आवश्यक सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या भेटीदरम्यान शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित चार महत्त्वाच्या विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
पूर नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करा
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत (MRDP) पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांना गती देऊन निर्धारित वेळेत पूर्ण करावे, जेणेकरून भविष्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी शहर सज्ज राहील, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
पाणीटंचाई रोखण्यासाठी जलस्रोत कार्यान्वित करा
आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, महापालिका क्षेत्रातील जुने सबमर्सिबल पंप तसेच इतर उपलब्ध जलस्रोत पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी
महानगरपालिकेच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसरात नियमित स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, असेही शिष्टमंडळाने सुचविले.
बंद पथदिव्यांमुळे शहर अंधारात; दिवाळीपूर्वी दुरुस्ती करा
महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दिवाळीचा सण जवळ आला असताना शहरातील पथदिवे तातडीने दुरुस्त करून संपूर्ण शहर प्रकाशमय करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
नागरिकांच्या समस्या सोडविणे, शहराच्या विकासाला गती देणे आणि मूलभूत सुविधा सक्षम करणे यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख मोहन वनखंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात शिवसेना महापालिका गटनेते तथा नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेवक सागर वनखंडे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख रावसाहेब घेवारे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख सुनीताताई मोरे, संपर्कप्रमुख महादेव सावंत, शहरप्रमुख सचिन कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पाटील आणि डिजिटल मीडियाचे हर्षद जोशी उपस्थित होते.

