डीपीडीसी योजनेतील १ कोटी १५ लाखांच्या देयकांसाठी मागितली होती एक टक्का लाच; वाशिममध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाच्या वाशिम येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. वित्त व लेखा विभागातील वर्ग-१ पदावरील व्यवस्थापकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. बबलू ईश्वरदास चौलीवार (वय ४१), असे ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे वीज वितरण महामंडळाच्या कार्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संताजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, मालेगाव येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संस्थेसह श्री साई इंटरप्रायजेस, मालेगाव आणि त्यांच्या मित्राच्या आस्था इलेक्ट्रिकल, मंगरूळपीर या संस्थांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळांतर्गत डीपीडीसी योजनेची कामे केली होती. या कामांची अनुक्रमे ८२ लाख रुपये आणि ३३ लाख रुपये अशी एकूण १ कोटी १५ लाख रुपयांची देयके अदा करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे उच्चस्तरीय मंडळ कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती.
मात्र, या देयकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यवस्थापक बबलू चौलीवार यांनी एकूण देयकांच्या एक टक्का रकमेची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२९ ते २.४३ या वेळेत पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी तक्रारदाराच्या मित्राच्या देयकासाठी तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे, तसेच तक्रारदाराच्या देयकासाठी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे संबंधित अधिकाऱ्याने मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ४.१४ ते ४.३७ या वेळेत वीज वितरण महामंडळाच्या वाशिम येथील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याच्या दालनात सापळा रचला. यावेळी बबलू चौलीवार यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर व अपर पोलीस अधीक्षक सुनील किनगे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या पर्यवेक्षणाखाली आणि पोलीस निरीक्षक सुलभा राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस हवालदार विनोद मार्कंडे, समाधान मोघाड, मो. मुंबशीर, रमेश गोडघासे आणि चालक शेख नाविद यांचा समावेश होता.
लाच मागितल्यास तक्रार करा
शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अमरावती परिक्षेत्र कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक : ०७२१-२५५३०५५
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा हेल्पलाइन क्रमांक : १०६४

