कर्जवसुलीच्या जाचातून महिलांची मुक्तता करा; ७ नोव्हेंबरला मानोरा तहसीलवर हजारोंचा मोर्चा – प्रमोद आडे यांचे आवाहन

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

एका बाजूला निसर्गाची अवकृपा, दुसऱ्या बाजूला आर्थिक संकट आणि त्यात फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा तगादा अशा दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. हाताला काम नाही, घरात पैसा नाही, शेतीतून उत्पन्नाची शाश्वती नाही मात्र, फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीचा ससेमिरा काही थांबण्याचे नाव घेत नाही. महिलांवर कर्जफेडीसाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारींमुळे आता या अन्यायाविरोधात महिलांचा एल्गार उभा राहणार आहे.

परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२६ रोजी मानोरा तहसील कार्यालयावर हजारो महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या जाचातून महिला बचत गटांना मुक्त करा आणि कर्जदार महिलांना दिलासा द्या, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. या मोर्चाची माहिती परिवर्तन शेतकरी संघटनेचे प्रवर्तक मनोहर राठोड आणि माजी पंचायत समिती सदस्या छायाताई राठोड यांनी दिली.

सरकारचे आदेश कागदावर नकोत; प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओद्वारे महिला बचत गटांच्या कर्जवसुलीबाबत फायनान्स कंपन्यांना दिलेल्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे. केवळ घोषणा आणि आदेश देऊन महिलांच्या अडचणी सुटणार नाहीत, तर संबंधित कंपन्यांवर प्रत्यक्ष नियंत्रण आणून कर्जदार महिलांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरक चतुर्दशीच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, राष्ट्रीय प्रबोधनकार पंकजपाल महाराज आणि अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा हे मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत.

हाताला काम नाही, घरात पैसा नाही; मग कर्जाचा हप्ता भरायचा तरी कुठून?

यंदा पावसाने दिलेल्या खंडामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला पुरेसे काम नाही. शेतीचे उत्पन्न घटले असून सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनानेही दुष्काळ जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत महिला बचत गटांच्या कर्जवसुलीसाठी वारंवार तगादा लावला जात असल्याने महिलांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

दिवाळीसारख्या सणाच्या काळातही महिलांना कर्जवसुलीच्या दबावाखाली राहावे लागत असेल, तर त्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कर्जदार महिलांना तातडीचा दिलासा मिळावा, फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या पद्धतीवर नियंत्रण आणावे आणि कर्जवसुलीला स्थगिती देण्याबाबत योग्य ते आदेश काढावेत, अशा मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहेत.

हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे – प्रमोद आडे

फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या जाचातून महिलांची सुटका व्हावी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना शासनदरबारी वाचा फुटावी, यासाठी मानोरा तालुक्यातील कर्जदार महिला, बचत गटांच्या सदस्या आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे तालुकाध्यक्ष प्रमोद आडे यांनी केले आहे.