आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा
LIVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या अध्यक्षतेखाली रिसोड तालुक्यातील दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजना आणि पाणीटंचाई निवारणासंदर्भात आढावा बैठक पंचायत समिती, रिसोड येथे पार पडली.
या बैठकीत तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन करावे, तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी, वाशिम, तहसीलदार, रिसोड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती रिसोड, तालुका कृषी अधिकारी, रिसोड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, रिसोड यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजना आणि पाणीटंचाई निवारणाच्या दृष्टीने आयोजित या बैठकीत विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

