शिपूर गावातील विकासकामांचा बोजवारा; जलजीवन योजना रखडली, स्मशानभूमीची दुरवस्था नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शिपुर गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या बाता मारणारे नेते आणि विकासकामांची जबाबदारी असलेले प्रशासन प्रत्यक्ष कामाच्या वेळी मात्र कुठे गायब होते, असा सवाल शिपूर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. गावातील विकासकामांना जणू कोणाची नजर लागली आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे जलजीवन योजनेचा बोजवारा उडाल्याची चर्चा असतानाच आता गावातील स्मशानभूमीचीही दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, या गंभीर समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
गावाच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली जातात, विकासाच्या गप्पा रंगतात; मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची अवस्था पाहिली तर विकास नेमका कुठे झाला, असा प्रश्न उपस्थित होतो. जलजीवन योजनेच्या कामाबाबत आधीच नाराजी असताना स्मशानभूमीच्या दुरवस्थेने आणखी एक गंभीर प्रश्न निर्माण केला आहे.

स्मशानभूमीचा शेड मोडकळीस; माकडांच्या उड्यांनी नुकसान
शिपूर गावातील स्मशानभूमीच्या शेडची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. माकडांनी शेडवर उड्या मारल्यामुळे छताचे पत्रे आणि इतर बांधकामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे.
अंत्यसंस्कार करतानाही जीव मुठीत
मृत व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमी ही अत्यंत महत्त्वाची जागा असते. मात्र, शिपूरमधील स्मशानभूमीची सद्यस्थिती पाहता येथे अंत्यसंस्कार करतानाही नागरिकांना सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. शेडचे खांब कमकुवत झाले असतील, तर ते कधी कोसळतील याची खात्री नाही. छतावरील पत्रे तुटून खाली पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अंत्यसंस्कार सुरू असताना एखादा खांब किंवा पत्रा नागरिकांच्या अंगावर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संभाव्य अनर्थ घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे.
विकासाच्या गप्पा नकोत, प्रत्यक्ष कामे दाखवा
गावात विकासकामांच्या नावाने केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे का? जलजीवन योजनेची परिस्थिती आणि स्मशानभूमीची दुरवस्था पाहता ग्रामस्थांकडून असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून विकासाच्या गप्पा मारण्यात काय अर्थ, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने स्मशानभूमीची पाहणी करून धोकादायक शेडची दुरुस्ती करावी, आवश्यक असल्यास नवीन शेड उभारावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि चौकशी करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिपूरच्या स्मशानभूमीच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त कधी मिळणार? ग्रामस्थांच्या या प्रश्नाला ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातील नेतेमंडळी काय उत्तर देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

