CEIR पोर्टलच्या मदतीने आतापर्यंत ६१ मोबाईलचा शोध; ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी मानोरा पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, ६ नोव्हेंबर रोजी आणखी १६ गहाळ मोबाईल फोन शोधून ते संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या मोबाईलची अंदाजे किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे.
मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळण्याची आशा अनेकजण सोडून देतात. मात्र, मानोरा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून गहाळ मोबाईल शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ६१ गहाळ मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांची अंदाजे किंमत ६ लाख १० हजार रुपये आहे. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच पोलिसांवरील विश्वासही अधिक दृढ होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यास गहाळ वस्तूंचा शोध घेणे शक्य आहे, हे मानोरा पोलिसांनी या मोहिमेतून दाखवून दिले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलीस अंमलदार वैभव गाडवे आणि पंकज खाडे यांनी केली.
गहाळ मोबाईल शोधून ते नागरिकांना परत मिळवून देण्याच्या मानोरा पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

