पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ रखडला; प्रक्रिया पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अपेक्षा असलेल्या वाशिम जिल्ह्यातील तब्बल १० हजार ६२७ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्रता असूनही या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने ही कर्जमाफी योजना सुरू केली आहे. मात्र, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असल्याने तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेत अनेक शेतकरी अडकले आहेत. जिल्ह्यातील १० हजार ६२७ शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने त्यांच्या कर्जमाफीचा मार्ग सध्या अडचणीत सापडला आहे.
 
आधीच अवर्षण, अतिवृष्टी, नापिकी आणि शेतीमालाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार वाढला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
 
ई-केवायसी अपूर्ण राहण्यामागे तांत्रिक अडचणी, आधार क्रमांक आणि बँक खात्यातील माहितीतील तफावत, मोबाईल क्रमांकासंबंधी समस्या तसेच प्रक्रियेविषयी अपुरी माहिती अशी विविध कारणे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने केवळ आकडेवारी जाहीर न करता प्रत्यक्ष गावपातळीवर जनजागृती आणि मदत केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
 
प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याची गरज
 
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १० हजार ६२७ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असताना कृषी व सहकार विभागाने संबंधित बँका आणि सेवा केंद्रांच्या समन्वयातून विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे. प्रत्येक गावातील प्रलंबित लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देत त्यांना वैयक्तिक सूचना द्याव्यात. तसेच तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
कर्जमाफीची घोषणा करणे पुरेसे नाही, तर तिचा लाभ शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. ई-केवायसीच्या प्रक्रियेत अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन किती तत्परतेने पावले उचलते, याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.