महाबोधी महाविहारासह इतर विहारांच्या मुक्ती आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी धम्मकाया मिशनच्या वतीने वाशिम येथे बौद्ध धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, वाशिम येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपासिका संघाच्या अध्यक्षा सविता गौतम शेजूळ यांनी केले आहे.
या संमेलनात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, धम्मप्रचारकांची निर्मिती आणि उपासिका संघाचे पुनरुज्जीवन या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात येणार आहे. महाबोधी महाविहार मुक्तीचा प्रश्न केवळ धार्मिक नसून तो बौद्ध समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी संबंधित असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.
सविस्तर उद्बोधन आणि मान्यवरांचे मार्गदर्शन
बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारामध्ये धम्मप्रचारकांची भूमिका या विषयावर डॉ. सुजित बोधी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पाच कोटी प्रचारकांची निर्मिती या विषयावर धम्मकाया मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उपासक ॲड. प्रवीण पंडित विचार मांडणार आहेत. उपासिका संघाचे पुनरुज्जीवन या विषयावर धम्मकाया मिशनच्या उपासिका संघाच्या राष्ट्रीय संयोजिका उपासिका ॲड. माधुरी भालेराव मार्गदर्शन करणार आहेत.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी धम्मकाया मिशनचे विदर्भ विभाग प्रमुख उपासक शैलेश कापसे राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपासक प्रताप नवघरे करणार असून, सूत्रसंचालन उपासिका सविता शेजूळ करणार आहेत. स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपासक गजानन उमाळे राहणार असून, आभार प्रदर्शन उपासक राहुल तायडे करणार आहेत.
या संमेलनाला धम्मकाया मिशनची केंद्रीय कार्यकारिणी, राज्याध्यक्ष उपासक सचिन गायकवाड, उपासिका शीतल सावळे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि बौद्ध चळवळीतील मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी व्यापक जनाधार निर्माण करणे, संघटनात्मक बळ वाढविणे आणि आर्थिक पाठबळ उभारणे, या दृष्टीने या संमेलनातून महत्त्वपूर्ण दिशा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

