नैसर्गिक आपत्ती विभागाकडून आर्थिक मदत मंजूर; दुःखाच्या प्रसंगी राठोड कुटुंबाला प्रशासनाचा  आधार

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजारजवळ असलेल्या तांदळी येथील राहुल विष्णू राठोड (वय ३०) या युवकाचा मागील महिन्यात अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नैसर्गिक आपत्ती विभागामार्फत त्यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

राहुल राठोड हे गुरे चारण्यासाठी आणि शेतीकामासाठी गेले असताना अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाल्याने नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी ते घराकडे परतत होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. राहुल हे कुटुंबातील कमावते सदस्य असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने संपूर्ण गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

या दुःखद प्रसंगी मंगरूळपीरचे आमदार शामभाऊ खोडे आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींनी राठोड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगी आपण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांना आवश्यक मानसिक व आर्थिक आधार देण्याची ग्वाही दिली होती.

त्यानंतर नैसर्गिक आपत्ती विभागामार्फत राठोड कुटुंबाला चार लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यात आली. दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महिनाभराच्या आत ही मदत मिळाल्याने संकटाच्या काळात कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून तत्परतेने पाठपुरावा होणे महत्त्वाचे ठरते. यावेळी आमदार शामभाऊ खोडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.