संत झोलेबाबा यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; रात्री ८.३० वाजता कीर्तन सोहळा, भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मंगरूळपीर तालुक्यातील श्रीक्षेत्र चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत आज, सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता ह.भ.प. कैलास महाराज येवले (आळंदीकर) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्रीक्षेत्र चिखली येथे दि. २८ ऑक्टोबरपासून या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला असून, विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. संतांच्या विचारांचा प्रसार, भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संदेश या महोत्सवाच्या माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

आजच्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. कैलास महाराज येवले (आळंदीकर) आपल्या ओघवत्या वाणीतून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. या कीर्तनाचा लाभ परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री संत झोलेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती, चिखली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी संत झोलेबाबा यांचा ४९ वा पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांसह उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.