काजळेश्वर येथील कमलाबाईंना दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट; सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी उपक्रम
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सण-उत्सव म्हणजे केवळ स्वतःच्या आनंदाचा सोहळा नव्हे, तर समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची संधीही असते. याच सामाजिक जाणिवेतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे यांनी यंदाच्या दिवाळीत प्रेरणादायी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या ज्योतीताई गणेशपुरे यांनी काजळेश्वर येथील आदिवासी समाजातील कमलाबाई यांची दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. या भेटीतून त्यांनी केवळ मदतीचा हातच पुढे केला नाही, तर समाजातील गरजू घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा, हा संवेदनशील संदेश दिला.

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू आणि गरीब कुटुंबांना मदत करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. दिवाळीच्या झगमगाटात समाजातील अनेक गरीब कुटुंबांच्या घरात मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अंधार कायम असतो. अशा कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.

केवळ मोठ्या देणग्यांनीच नव्हे, तर छोट्याशा मदतीनेही एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविता येतो, हे ज्योतीताईंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

यावेळी त्यांनी सर्वांना आवाहन करताना, प्रत्येकाने आपल्या परीने गरजू आणि गरीब कुटुंबांना मदत करावी आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचा व आशेचा दीप उजळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दिवाळीच्या दिव्यांसोबतच माणुसकीचा दीपही तेवत ठेवणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.