फटाक्यांऐवजी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन; विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क


आसेगाव येथून जवळच असलेल्या शिवनी (द) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील आणि पणती सजावट उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


शाळेत नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक बांदे सर आणि त्यांच्या शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनाचे धडे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी रुजले पाहिजेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा समतोल, वाढते प्रदूषण, वृक्षसंवर्धन आणि निसर्गाचे महत्त्व याविषयी सखोल माहिती देण्यात आली. आगामी दिवाळी सणात फटाक्यांची आतषबाजी टाळून साधेपणाने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन शिक्षकांनी केले. तसेच गावातील नागरिकांपर्यंतही पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी, अशी संकल्पना मांडण्यात आली.


एक झाड लावा, त्याचे संगोपन करा

पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे योग्य संगोपन करावे आणि ते जगवावे, असे आवाहन मुख्याध्यापक बांदे सर व शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांना केले. पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यावर भर देण्यात आला.


या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक आकाशकंदील आणि पणत्यांची आकर्षक सजावट केली. त्यांच्या या कृतीतून प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला.


यावेळी मुख्याध्यापक बांदे, मिलिंद भगत, भोडणे, गोसावी यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.