मटका-जुगार अड्ड्यांचे जिल्हाभर पेव; पंटरांवर कारवाईचा देखावा, बडे सूत्रधार मात्र मोकाट! राजकीय वरदहस्ताच्या आरोपांची चौकशी कधी?
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मटका आणि जुगार अड्ड्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आता तर मिरजेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकळी गावात खुलेआम तीन पानी जुगाराचा डाव रंगत असल्याची चर्चा आहे. अवैध धंद्यांचा हा वाढता पसारा पाहता पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
एकीकडे दुष्काळी परिस्थितीचे संकट, दुसरीकडे रोजगाराच्या संधींचा अभाव आणि आर्थिक विवंचनेत सापडलेला सामान्य माणूस. अशा परिस्थितीत झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी काहीजण जुगाराच्या विळख्यात अडकत आहेत. विशेषतः मिरज तालुक्याच्या पूर्व भागात अशा प्रकारांना ऊत आल्याचे चित्र आहे. गावातील मोकळ्या जागा, पडक्या इमारती आणि निर्जन ठिकाणे जुगारबहाद्दरांचे अड्डे बनत असल्याच्या तक्रारी आहेत.
टाकळीतील नव्याने सुरू झालेल्या तीन पानी जुगार अड्ड्यामागे नेमके कोणते मोहरे आहेत? त्यांचे पंटर कोण? हा धंदा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची नाही काय? जुगार अड्ड्यांसोबत क्लब आणि व्हिडिओ पार्लरच्या नावाखालीही काही ठिकाणी अवैध प्रकार सुरू असल्याचे आरोप होत आहेत. अशा ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर वाढत असल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
पंटर पकडायचे आणि सूत्रधारांना मोकळे सोडायचे?
पोलिसांकडून छापे टाकले जातात, किरकोळ पंटर पकडले जातात आणि गुन्हे दाखल होतात. मात्र, या धंद्याचे खरे सूत्रधार आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारे बडे मासे कारवाईच्या जाळ्यात का सापडत नाहीत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे जुगार अड्डे आणि व्हिडिओ पार्लर सुरू असल्याचे आरोपही केले जात आहेत. या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, अशा धंद्यांशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्यांपैकी काहीजण सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असल्याचीही चर्चा आहे. सामाजिक प्रतिष्ठेच्या आडून अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असेल, तर ते अधिक गंभीर आहे.
काही वर्षांपूर्वी जुगार अड्डे चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा कठोर आणि व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. केवळ पंटरांवर गुन्हे दाखल करून कारवाईचा आकडा वाढविण्यापेक्षा अड्ड्यांचे मुख्य सूत्रधार, आर्थिक पाठबळ देणारे आणि त्यांना संरक्षण देणारे घटक यांच्यापर्यंत तपास पोहोचला पाहिजे.
अवैध धंद्यांना लगाम घालणार कोण?
जुगार अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टाकळीतील तीन पानी जुगार अड्ड्यासह सांगली, मिरज, कुपवाड आणि ग्रामीण भागातील अवैध जुगार धंद्यांची पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी. कारवाईचा बडगा केवळ छोट्या पंटरांवर नव्हे, तर या धंद्याच्या मुळावर चालवावा.