राजस्थानहून आलेल्या बटाट्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; ट्रकसह संपूर्ण माल खाक, सुदैवाने जीवितहानी नाही
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरूळपीर शहरालगतच्या मंगळसा फाट्याजवळ १९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास बटाट्यांनी भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान येथून बटाटे घेऊन आलेल्या या ट्रकने मंगळसा फाट्याजवळ अचानक पेट घेतला. सुरुवातीला लागलेली आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली. आगीची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. एवढेच नव्हे, तर ट्रकचे सर्व टायरही आगीत जळाले असून, ट्रकसह त्यातील बटाट्यांचा संपूर्ण माल नष्ट झाला आहे.
 घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मंगरूळपीर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीची तीव्रता मोठी असल्याने ती विझवताना जवानांना विशेष प्रयत्न करावे लागले. अखेर अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
 प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रक आणि त्यातील संपूर्ण माल जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, भररस्त्यालगत ट्रकने अचानक पेट घेतल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न

ही आग विझविण्यासाठी अग्निशमन वाहनचालक शाम खंडेतोड, फायरमन गोपाल गिरे, गोपाल मस्के, शुभम भोपळे, राहुल चेके, अमोल मानेकर, सौम्य खोडके, सहकारी ओम मोरवाल यांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. सदर घटनेचा पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करीत आहेत.